निफाड ( वार्ताहर )
दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास निफाड नाशिक महामार्गावर दोन मोटरसायकलस्वार तरुणांनी अपंग ट्रॅक्टर चालकास मारझोड करीत त्याच्याकडील दहा हजार रुपये आणि मोबाईल हँडसेट चोरून नेलेला होता. निफाड पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून दोन आरोपींना ताब्यात घेतले .
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास निफाड नाशिक महामार्गावरील कादवा पुलाजवळ एक ट्रॅक्टर चालक आपल्या ट्रॅक्टरने जात असताना दोन मोटार सायकल स्वार युवकांनी त्याला वाटेत अडविले आणि गुंडगिरी करीत त्याला ट्रॅक्टर वरून खाली ओढत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. सदर ट्रॅक्टर चालक हा पायाने अपंग असताना देखील त्याला मारझोड करीत त्याच्या खिशातील दहा हजार रुपयांची रोकड रक्कम आणि मोबाईल संच या चोरट्यांनी पळवून नेला. सदर ट्रॅक्टर चालकाने निफाड पोलिसांना या घटनेची खबर दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्ह्याचा तपास करीत घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल हँडसेट च्या मालकांचा तसेच फिर्यादीने आरोपींच्या कपड्यांचे केलेल्या वर्णनाचा धागा घेऊन कसबे सुकेने येथील रहिवासी आकाश ज्ञानेश्वर सानप आणि जळगाव फाटा निफाड येथील रहिवासी नवनाथ अरुण शिंदे या दोन संशयित आरोपी युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरी गेलेला मोबाईल हँडसेट गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि गुन्ह्याच्या वेळेस वापरलेले कपडे असा मुद्देमाल जप्त केला.
नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निफाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, उपनिरीक्षक राजेंद्र बाविस्कर, विश्वनाथ निकम आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला.


























