न्यूयॉर्क। भारतीय आध्यात्मिक परंपरेचा जागतिक स्तरावर गौरव करणारी एक अत्यंत अभिमानास्पद घटना नुकतीच अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे घडली. जैन आचार्य डॉ. लोकेश मुनिजी महाराज यांना संयुक्त राष्ट्रसंघ आणि न्यूयॉर्क स्टेट काउंटी यांच्यावतीने अहिंसा, शांतता आणि मानवी मूल्यांच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सन्मानाने गौरवण्यात आले.
या ऐतिहासिक सन्मानाच्या सोहळ्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध देशातील राजदूत, आध्यात्मिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात आचार्य डॉ. लोकेश मुनिजींनी जगासमोर भारताची अहिंसेची, सहिष्णुतेची आणि संयमाची परंपरा प्रभावीपणे मांडली.
न्यूयॉर्क स्टेट काउंटी तर्फे त्यांना ‘ग्लोबल पीस अँड हार्मनी अॅम्बेसेडर’ या किताबाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभाव वाढला आहे, असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी यावेळी काढले.
आचार्य डॉ. लोकेशजी हे अहिंसा विश्व भारती संस्थेचे संस्थापक असून त्यांनी समाजात धार्मिक सहिष्णुता, मूल्यशिक्षण, आणि वैश्विक बंधुभावना यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अनेक देशांमध्ये प्रेरणादायी कार्य केले आहे.
या गौरवामुळे भारताला आणि विशेषतः जैन समाजाला जागतिक व्यासपीठावर एक मानाचा तुरा मिळाला आहे. आचार्य लोकेशजींचे विचार आणि कार्य आजच्या जगासाठी दिशा दर्शक ठरत आहेत.
ही घटना संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असून, भारतीय अध्यात्माची उज्ज्वल ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित करणारी आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ आणि न्यूयॉर्क स्टेट काउंटी यांच्यावतीने जैन आचार्य डॉ. लोकेशमुनीजी यांचा ऐतिहासिक सन्मान






















