पुणे : व्यक्ती म्हणून घडत असताना आपण कसं घडलं पाहिजे याचं सार अंतगड सूत्रात सांगितले आहे. आयुष्य जगत असताना आपण खूप सार्या गोष्टी वर वर पाहत असतो आणि त्या तशाच पद्धतीने जगत असतो. जीवन जगताना आपण सखोल विचार करत नाही. यासाठी आपण स्वतःच आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. हा बदल घडवण्यासाठी आपल्याला अंतगड सूत्र अतिशय फायदेशीर ठरतं. ते आचरणात आणल्याने आपल्या मध्ये सकारात्मक बदल घडून येतात, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, स्वतःचे परीक्षण करताना एक गोष्ट आवर्जून पहा. माझ्याजवळ सगळं आहे तरी मी एकटाच अशी उणेपणाची भावना येते. ही एकटेपणाची भावना आपल्याला सतत खात असते. पण ही भावना का येते? आपले प्रसंग, अनुभव वाटून घेण्यासाठी, गोष्टी सांगण्यासाठी आपल्या जवळची हक्काची माणसं असतात. पण कधी कधी त्याच जवळच्या माणसांना आपण आपले अनुभव सांगू शकत नाही किंवा तशी इच्छाच नसते. कारण त्यावेळेला ती आपल्यासाठी परकी झालेली असतात. जवळच्या नात्यात, मैत्रीत दुरावा का निर्माण होतो?
एखादा काम करायला जर आपण गेलो तर ते काम सफल होत नाही त्यात काही ना काही तरी अडचणी येऊन ते काम पुढे जात नाही त्या वेळेला स्वतःमध्ये एकदा डोकावून पहा आपण कधी कोणाच्या कामात अडथळा बनलो होतो का?
असे अनुभव अशा अडचणी ज्यावेळी आपल्या वाट्यास येतात आपल्याला अनुभवायला मिळतात त्याप्रसंगी स्वपरिक्षण होणे फार गरजेचे आहे. स्वतःला पडताळून पाहायला हवं आणि मग लक्षात येईल. मी ज्या वाटेवरून चाललो आहे ती वाट योग्य आहे ना? माझ्या या वाटेवर समस्या अधिक आहेत की समाधान अधिक आहे.?
त्यावरून आपले विचार कशा पद्धतीचे आहेत आणि आता ते कोणत्या पद्धतीने करायला हवेत हे समजते. यासाठी हातून पुण्य कर्म व्हायला हवे. आयुष्यात जर पुण्यकर्म केले तर नक्कीच सुख समाधान आपल्याला शोधत येत.
ज्या व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्व घडवायचा आहे त्या व्यक्ती योग्य मार्ग स्वीकारून त्या मार्गावर चांगल्या गोष्टी कशा करता येतील हे पाहतात त्या कायमच सत्याचा मार्ग स्वीकारतात. सत्य बोललं तर शंकेचा निरसन होतं सत्य बोलून समाधान प्राप्त होतं सत्य बोललं तर विकोपाला जाणारे वादही मार्गी लागतात
आपलं शरीर, मन, आत्मा, इंद्रिय जे काही दर्शवत आहेत त्या पलीकडचं सत्य आपल्याला पाहता आलं पाहिजे. आपली इंद्रिय हे आपल्याला खुपवेळा अर्धसत्यच दाखवत असतात. अर्धसत्य हे असत्यापेक्षाही भयंकर असतं. पण सत्य बोलतानाही खूप गोष्टींचे परिस्थितीचे भान ठेवणे गरजेचे आहे त्यातून समस्या निर्माण होणार आहेत असे सत्य टाळणे गरजेचे आहे. दृष्टी आड सृष्टी या उक्तीप्रमाणे काही काही गोष्टींचे भ्रम तसंच राहणं चांगलं असतं. सर्वांत महत्वाचे जीवनात संशयाला स्थान देऊ नका. संशय ही जरी छोटीशी गोष्ट असली तरी त्यातून उद्भवलेले वादळ आयुष्य उध्वस्त करून जाते. त्यामुळे जर घरातल्यांवर अथवा इतर कोणावर संशय आलाच तर तो मोकळेपणाने बोला. वादापेक्षा संवादाला प्राधान्य द्या. प्रत्येक व्यक्तीची कोणा ना कोणावर श्रद्धा असते. आस्था असते. त्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नका. अशामुळे परस्परांमध्ये अविश्वास निर्माण होऊ शकतो. परस्परांतूनच सामुदायिक चेतना वाढीस लागते. याचाच अर्थ ‘मी पेक्षा आम्ही’ महत्त्वाचे आहे. यातून परस्परांमध्ये एकजूट आहे, संघटन आहे हे स्पष्ट होते. अशी दुःखाचा अंत करणार सूत्र अंतगड सूत्रात सांगितलं आहेत.
आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये बदल घडवा: प. पु. प्रवीणऋषीजी म. सा.






















