लासलगाव -दर वर्षी जुलै महिन्यात डेंग्यू प्रतिरोध दीन साजरा करण्याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निफाड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय निफाड व तालुका आरोग्य विभाग, पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यामाने डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
डॉ राजीव तांभाळे, वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय निफाड यांनी डेंग्यू आजाराबाबत माहिती देताना सांगितले की, डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा आजार असून दरवर्षी पावसाळ्याच्या कालावधीत याचा फैलाव वाढतो. यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यूविषयी जनजागृती निर्माण करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे यासाठी डेंग्यू प्रतिरोध दिन साजरा केला जातो. याकरिता साथरोग किटक शास्त्रीय सर्वेक्षण गावपातळीवर सर्व आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांना करण्याबाबत आदेशित आहे.
या दिनानिमित्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुजित कोशिरे यांनी सांगितले की,डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी पुढील उपाय अत्यावश्यक आहेत
1. घरासमोर व आजूबाजूला पाणी साचू देऊ नये
2. पाण्याची टाकी, ड्रम, कूलर इ. झाकून ठेवावेत
3. आठवड्यातून एकदा कोरड्या दिवसाचे पालन करावे
4. संध्याकाळी व सकाळी पुर्ण बाह्य कपडे वापरावेत
5. डासांना पाय रोखण्यासाठी मच्छरदाणी, रेपलंट वापरावे
उपजिल्हा रुग्णालय निफाड व निफाड तालुका आरोग्य विभाग प्रमुखांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, “डेंग्यू टाळायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. सरकार, संस्था आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास डेंग्यूवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.” तसेच नगरपंचायत निफाड व सर्व ग्रामपंचायत यांच्याकडून दैनदिन घनकचरा गोळा करणाऱ्या गाडीतून ध्वनीप्रक्षेपनावरून अधिकची जनजागृती करण्याकरीता आव्हान करण्यात येत आहे.






















