पाटोदा (प्रतिनिधी) पारगाव घुमरा ग्रामपंचायतीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) प्रत्यक्ष काम न करता बनावट बिले उचलल्याचा गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शिवराम गांगुर्डे व भरत काळे यांनी पाटोदा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.यापूर्वी दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी आंदोलकांनी आमरण उपोषण केले असता, गट विकास अधिकारी यांनी १५ दिवसांत चौकशी करून कारवाईचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी पुन्हा आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आले आहे.आंदोलकांचा आरोप आहे की, पारगाव घुमरा ग्रामपंचायतीने नरेगा अंतर्गत काही कामे कागदावर दाखवून शासकीय निधीचा गैरवापर केला आहे. प्रत्यक्षात कामे अस्तित्वात नसताना बिले उचलण्यात आली असून, दलित वस्तीतील अनेक कामे आजही अपूर्ण आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी, ग्रामसेवक व अभियंत्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. न्याय मिळत नसल्यामुळे आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी नाइलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.पारगाव घुमरा ग्रामपंचायतीतील नरेगा कामांची सखोल चौकशी, बनावट बिलांची तपासणी, दोषी अधिकारी व ग्रामसेवकांवर शिस्तभंगात्मक कारवाई, गैरवापर झालेला निधी शासनाकडे परत मिळवणे तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंदोलक शिवराम गांगुर्डे व भरत काळे यांनी दिला आहे
*पारगाव घुमरा ग्रामपंचायत नरेगा भ्रष्टाचारा विरोधात पाटोदा पंचायत समितीसमोर काळे,गांगुर्डे यांचे आमरण उपोषण*

























