पिंपरी पुणे: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केले.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार
नितीन पवार यांनी सांगितले की, ‘गेल्या बारा दिवसापासून पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांना ऍडमिट केलेले होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यानंतर त्यांची किडनी फेल झाली आज आठ वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झालं. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत


























