पुणे। कोणतीही गोष्ट करताना ती कधी हातची राखून करू नका. तिथेही तुमचे शंभर टक्के देणं आवश्यक आहे. जे कराल ते सर्वोत्तम करालं. काहीही मागे न ठेवता आपल्याकडे असलेल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम देणे म्हणजेच शंभर टक्के प्रयत्न करणे होय, असे मत प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी व्यक्त केले.
‘परिवर्तन २०२५’ या चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेत ते मार्गदर्शन करीत होते. प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, एखादं काम आपण करू शकलो असताना पण आपण जर ते केलं नाही तर त्याची आपल्याला खंत राहते, कारण आपल्याला ते जमू शकत होतं, पण त्यासाठी आपण प्रयत्न केला नाही असं वाटत राहते. आपण आपल्याकडे असलेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करायला हवा.
प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, आपल्याकडे दोन प्रकारच्या शक्ती असतात एक असते शरीराची शक्ती तर दुसरी आत्म्याची चैतन्य स्वरूप शक्ती. त्यामुळे जो आपल्या सामर्थ्याला, शक्तीला आपल्या आत दडवून ठेवतो त्यास प्रभू महावीर ‘चोर’ असे संबोधतात. एखादी व्यक्ती आयुष्यात मागे राहत असेल, तिचा स्तर तर उंचावत नसेल तर त्याचा एकमेव कारण ती स्वतःच असते. कारण तिने आपल्या शरीर आणि आत्म्यामध्ये असणार्या शक्तीला दडवून ठेवले आहे. जर आपल्याला वाटत असेल की आपल्या शक्तीचा कायम विकास व्हायला हवा तर या शक्तींना कधीच दडवू नका. जर तुम्ही तुमच्या शक्तींना दडवून ठेवाल तर त्या तुमच्यावर ओझं बनून राहतील.
एकदा इंद्रभूती गौतम यांनी महावीरांना प्रश्न विचारला. ‘समान ताकदीचे, अंगी समान गुण असणारे, समान वजनाचे, समान उंचीचे… सारे काही समान असणारे दोन पैलवान कुस्ती खेळत असताना त्यातला एक पराभूत आणि एक जिंकतो. जर समानता होती, तर जो जिंकला तो का जिंकला? आणि जो पराभूत झाला तो का पराभूत झाला असेल? या प्रश्नाचे उत्तर देताना आपण म्हणू त्याच्या नशिबात होतं म्हणूनच तो जिंकला. त्याला देवाचा आशीर्वाद होता म्हणून तो जिंकला. पण प्रभू महावीर यांनी अतिशय मोजक्या शब्दात सांगितले की, ‘ज्यांनी आपल्या बळाचा, शक्तीचा, वीरतेचा पूर्ण उपयोग केला केवळ तोच जिंकला. म्हणजेच पराभूत होणं किंवा जिंकणं हे तुमच्या हातात आहे. यासाठी तुम्ही तुमच्या नशिबाला, परिस्थितीला किंवा देवाला दोष देऊ नका. तुमचं पराभूत होणं हे ईश्वराच्या हातात नसतं तर तुमच्या आत दडून बसलेल्या चोरामुळे आहे. आत दडून बसलेला चोर जेव्हा जागा होतो, तेव्हा तुम्ही पराभूत होता आणि तुमच्या आतला सावकार जेव्हा जागा होतो, तेव्हा तुम्ही जिंकलेले असता. जिंकणं किंवा पराभूत होणं हे महत्त्वाचं नसतं. पण त्यासाठी लढणं महत्त्वाचं असतं. ‘खूब लढी वो मर्दानी’ असं म्हणत ते म्हणाले, ज्या आवेशाने ती लढली ते पाहता ती पराभूत होऊनसुद्धा जिंकली आणि तिच्याविरुद्ध लढणारे जिंकून सुद्धा पराभूत झाले. यासाठी ती कशी लढली हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यात उद्या कधीच होत नसतो, म्हणून जोपर्यंत इंद्रिय क्षीण होत नाही, तोपर्यंत आपल्या आतील पुरुषार्थाने, सामर्थ्याने आपल्याला जगून घेता यायला हवे. त्याक्षणी आपला अंतिम श्वास हा केवळ कृतज्ञतेने नव्हे तर धन्यतेने भरलेला असेल.
आपल्याला खंत करत जगायचं आहे की आनंदात जगायचं हे दुसरं कोणी ठरवत नसतं हे केवळ आपणच आपल्यासाठी ठरवायचं असतं. याच प्रसंगाला आधारित त्यांनी शालीभद्र यांची कथा सांगितली. पुढे त्यांनी सेवा आणि अधिकारातील फरक समजावून सांगितला. आपल्याला आपल्या अधिकाराचा उपयोग करता यायला हवा. आई-वडिलांची, गुरुची सेवा करणं हे आपले कर्तव्य नसून तो आपला अधिकार आहे. रामाची सेवा करणे हा हनुमानाचा अधिकारच होता. याचाच अर्थ, फक्त सेवा घेणं हा अधिकार नसून एखाद्याची सेवा करणं हा अधिकार आहे.
आपली इच्छा झाल्यास ताबडतोब केल्यास कार्य यशस्वी होते :प्रवीणऋषीजी






















