निफाड, (आसिफ पठाण)
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून आज उपजिल्हा रुग्णालय, निफाड आणि निफाड नर्सिंग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली आणि पथनाट्य आयोजित करून एचआयव्ही/एड्स संदर्भात महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश देण्यात आला.
यावर्षीचा जागतिक एड्स दिन ‘सामाजिक संदेश’ देत उत्साहात साजरा करण्यात आला. रॅलीची सुरुवात डॉ. निलेश लाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी “एड्सला नाही, जागरूकतेला होकार”, “सुरक्षित रहा – निरोगी रहा” अशा जोरदार घोषणांनी निफाड शहर परिसर दुमदुमून सोडला.
रॅलीनंतर झालेल्या मार्गदर्शन सत्रात डॉ. निलेश लाड यांनी उपस्थितांना एचआयव्ही/एड्सचा प्रसार कसा होतो, प्रतिबंधाचे उपाय, उपचारांच्या उपलब्ध सुविधा आणि एड्सबाधित व्यक्तींना असलेले हक्क यावर सविस्तर माहिती दिली.
यावेळी आय.सी.टी.सी. विभागाचे समुपदेशक नितीन परदेशी यांनी एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी सुरक्षित लैंगिक व्यवहार, नियमित तपासणी आणि समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, त्यांनी टोल फ्री क्रमांक १०९७ आणि एचआयव्ही एड्स कायदा २०१७ याबद्दल माहिती दिली. आय.सी.टी.सी. विभागात एचआयव्ही तपासणीची मोफत सेवा उपलब्ध असून, सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
निफाड नर्सिंग विद्यालयाच्या प्राचार्यांनी यावेळी एड्सबाधित व्यक्तींप्रती सहानुभूती, त्यांना समर्थन देणे आणि समाजात त्यांच्याबाबत कोणताही भेदभाव न करता त्यांना सामावून घेण्याचा संदेश दिला. जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या पथनाट्य या उपक्रमाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पौर्णिमा कोंडके (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), मंगला बोरसे (अधिपरिचारिका), जनार्दन परदेशी (टीबी सुपरवायझर), निकिता तंवर, ऋषिकेश सानप (आरोग्य मित्र) आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी रॅलीमध्ये डॉ. संकेत आहेर, भाऊसाहेब कोल्हे, फणसे मॅडम, शिवांजली शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित निफाड नर्सिंग स्कूलचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. भगीरथ जाधव, ज्ञानेश्वर पवार, पुनम सोनवणे, शिक्षक अक्षय साखरे, विशाल पारधे, आनंद पवार, दीपांजली धीवरे, अश्विनी परदेशी, प्रवीण उगले आणि रिंकू गावित यांची उपस्थिती होती.
*एड्स जनजागृतीसाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने भव्य रॅली; पथनाट्यातून सामाजिक संदेश*


























