‘बालदिनी’ वैनतेय विद्यामंदिरातील चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण.
निफाड ( दीपक श्रीवास्तव)
मोबाईल, लॅपटाॅप, इंटरनेट, व्हिडीओ गेम यामधील आधुनिक बैठे खेळात गुंतलेल्या आजच्या पिढीला बालदिनानिमित्त विटी-दांडू, लगोरी, भोवरा, सूर पारंब्या, गोट्या, डबा स्पाईस यांसारख्या पारंपारिक खेळातून विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण करण्याचा यशस्वी उपक्रम वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेतील शिक्षक गोरख सानप यांनी राबविला.
१४ नोव्हेंबर देशाचे पहिले पंतप्रधान चाचा नेहरू’ यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. ‘प्रत्येक बालकासाठी,प्रत्येक हक्क’ ही या वर्षाच्या बालदिनाची संकल्पना आहे. मुलांना बालपणापासूनच मैदानी खेळाची आवड निर्माण झाली तर देशाची भावी पिढी शरीराने व मनाने आरोग्यसंपन्न तयार होईल. शिक्षक गोरख सानप यांनी मुलांना विटी-दांडू, भोवरा, लगोरी, गोट्या,आट्या-पाट्या, अम्पल-चम्पल, सागरगोट्या, टायर फिरवणे, मामाचं पत्र, डबा स्पाईस, भातुकली, सूर पारंब्या, लपाछपी, झोके, रिंगा, आबुधाबी, चप्पी-चप्पी, पोत्यांची शर्यत यांसारख्या खेळांची माहीती करून देत त्यांना या खेळासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांनी मनसोक्त खेळाचा आनंद घेत चिंचा, बोरं, पेरू, आवळे या रानमेव्याची चव चाखली. पारंपारीक, देशी खेळ खेळण्यात चिमुकले दंग झाले. कोणताही खर्च न करता अल्पखर्चीक, व सहज उपलब्ध होणा-या साहित्यातून पारंपारिक खेळातून विद्यार्थ्यांचा उत्तम व्यायाम तर होतोच, त्यासोबत खिलाडूवृत्ती, नेतृत्वगुण, मित्रप्रेम, संघप्रवृत्ती, जिद्द, चिकाटी, चुरस, उत्साह अशा विविध गुणांचा विकास होण्यासही मदत होते.
कालबाह्य होत चाललेल्या पारंपारीक खेळातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संवर्धन करणा-या तसेच बालदिनी बालकांच्या चेह-यावर हसू व आनंदाला उधाण देणा-या या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळ निफाड संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष वि. दा. व्यवहारे, सचिव रतन वडघुले, विश्वस्त किरण कापसे, राजेंद्र राठी, राजेश सोनी, ॲड. दिलीप वाघावकर, विश्वास कराड, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, नरेंद्र नांदे, निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विलास साळी, विस्तार अधिकारी लता भरसट, कैलास बोरसे, वसंत गायकवाड, केंद्रप्रमुख अनिता आहिरे व पालकांनी कौतुक केले.
निफाड : बालदिनानिमित्त भोवरा, विटी-दांडू, लगोरी या पारंपारिक खेळांचा आनंद घेत पेरू, चिंचा, बोरं, आवळे या रानमेव्याचा आस्वाद घेताना वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थी समवेत शिक्षक गोरख सानप.


























