लासलगाव, (आसिफ पठाण)– ओडिशा व उत्तराखंड राज्यातील महिला प्रतिनिधींनी आज कृषी विपणनातील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी लासलगाव बाजार समितीला भेट दिली. या अभ्यास भेटीचा मुख्य उद्देश कृषी विपणन क्षेत्रात महिलांचा सहभाग व त्यांचे योगदान जाणून घेणे हा होता.
यावेळी लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. सुवर्णा जगताप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, येथे महिलांचा केवळ सहभाग नाही तर सक्रीय सहभाग आहे. त्यांच्या मतांना निर्णय प्रक्रियेत महत्त्व दिले जाते आणि मतदानात त्यांची मते मोजली जातात. तसेच आपल्या सभापती पदाच्या कार्यकाळात त्यांनी कशा प्रकारे महत्त्वाचे निर्णय घेतले आणि ते सर्वांच्या सहकार्याने अमलात आणले, याची माहितीही त्यांनी प्रतिनिधींना दिली.
सौ. जगताप यांनी पुढे बाजार समितीचे दैनंदिन कामकाज, शेतकरी व व्यापाऱ्यांमधील व्यवहार प्रक्रिया, डिजिटल पेमेंट प्रणाली, तसेच महिलांच्या सहभागामुळे बाजार समितीची कार्यक्षमता कशी वाढली आहे याबाबत सविस्तर माहिती दिली.
या दौऱ्यात प्रतिनिधींनी लासलगाव बाजार समितीचे कामकाज पाहिल्यानंतर खानगाव नजीक येथील भाजिपाला लिलावालाही भेट देऊन प्रत्यक्ष बाजार प्रक्रियेचा अनुभव घेतला.






















