लोकसंघर्ष पक्षातर्फे श्री महेंद्र बेराड यांची भोकरदन तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

भोकरदन: सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘लोकसंघर्ष’ या संघटनेने भोकरदन तालुक्यात आपला विस्तार वाढवण्यास सुरुवात केली आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲड. योगेश दिनकर माकणे,पुणे यांनी नुकतीच पारध (शाहुराजे) येथील तरुण युवा उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते श्री महेंद्र संपत बेराड यांची भोकरदन तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यात ‘लोकसंघर्ष’च्या कार्याला गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या नियुक्ती पत्राद्वारे श्री. बेराड यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये तालुका समिती स्थापन करणे, सामाजिक समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आंदोलने करणे, प्रशासनाशी समन्वय साधणे, आगामी विधानसभा,लोकसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुकांमध्ये पक्षातर्फे सक्षम उमेदवारांची निवड करणे त्यांना पाठिंबा देणे, तसेच समाजातील सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना पक्षात सहभागी करून घेणे या प्रमुख कामांचा समावेश आहे.
श्री. बेराड यांच्या निवडीबद्दल ‘लोकसंघर्ष’ पक्षाने शुभेच्छा व्यक्त केल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन तालुक्यात पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ही नियुक्ती बेराड यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल पारध शाहूराजे परिसरातून तसेच संपूर्ण भोकरदन तालुक्यातील मित्र परिवार,कार्यकर्ते यांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *