आपली श्रद्धा अमर करा : प. पु. प्रवीणऋषीजी म. सा.

पुणे : अनंत श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजे. आपण करत असलेल्या प्रयत्नांवर आपली अतूट श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. या श्रद्धेला अमर करण्याचे पर्व म्हणजे पर्युषण पर्व आहे, असे प्रतिपादन प. पु. प्रवीण ऋषीजी म सा यांनी केले.
प. पु. प्रवीण ऋषीजी म. सा. म्हणाले, आपल्या जीवनामध्ये श्रद्धा येते आणि जाते, भक्तीचा भाव येतो आणि जातो, वैराग्य येते आणि जाते परंतु चांगले भाव भावना आपल्यामध्ये टिकून राहावेत यासाठीच पर्युषण पर्वाचा काळ आहे. पर्युषण पर्व हा आपल्या मनामध्ये चांगले बीज रुजवण्याचा काळ आहे. त्यामुळे त्या काळात आपल्याला फळ काय मिळते याहीपेक्षा आपल्यामध्ये चांगले काय रुजते आहे याकडे लक्ष देणे अधिक आवश्यक आहे. ज्या गोष्टीसाठी आपण पूर्वतयारी केलेली नसते ही गोष्ट आयुष्यात येते आणि जाते. पर्युषण पर्वही आपल्या आयुष्यात आले आणि गेले असे होऊ नये.
प. पु. प्रवीण ऋषीजी म. सा. म्हणाले, जर मला एखाद्या गोष्टीने राग येत असेल तर सुरुवातीला आणि शेवटी राग असतोच म्हणून तो मध्यभागी देखील प्रकट होत राहतो. परंतु सुरुवातीला आणि शेवटी क्रोधाचे अस्तित्व नष्ट झाले तर कोणत्याही प्रसंगाला क्रोध उत्पन्न होऊ शकत नाही.
जोपर्यंत आपल्याला सिद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडून चालणार नाही. निर्धाराने आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. अनेक जण एखादी गोष्ट हाती घेतात परंतु ती कार्य सिद्धीला जाण्यापूर्वीच सोडून देतात. सिद्धी प्राप्त होण्याचा क्षण हा पूर्णत्वाचा क्षण असतो. ज्या व्यक्ती अर्धवट सिद्धी सोडून देतात त्यांच्या जीवनातील साधना व्यर्थ होऊन जाते. यांनी आपले प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत अर्धवट सोडले नाही असेच महापुरुष केवलज्ञानाला प्राप्त झाले. यासाठी आपण पावनखिंडीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत प्राण्याची बाजी लावून लढणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. जे शेवटपर्यंत श्रद्धेने लढत राहिले, प्रयत्नशील राहिले त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. त्या दिशेने जाण्याचा प्रवास या पर्युषण पर्वाच्या काळात आपल्याकडूनही सुरू व्हावा अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *