नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना को- ब्रॅण्डेड आयुष्मान कार्ड वितरणासाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत मोहीमस्तरावर उद्दिष्टपूर्तीसाठी साध्य करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.
को- ब्रॅण्डेड आयुष्मान कार्ड वितरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ रामकुमार, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) तुकाराम हुलावळे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ.कुलदीप शिरपूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. पंकज दाभाडे, जिल्हा प्रमुख डॉ. राहुल जोगवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जगदीप पवार उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, आयुष्मान भारत कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात एकूण १४.५ लाख कुटुंबांची संख्या आहे, तर लाभार्थी संख्या ६१ लाख ६८ हजार आहे. त्या तुलनेत १७ लाख ६८ हजार एवढेच कार्ड वितरीत झाले आहेत. हे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. कार्ड निर्माण करण्यासाठी आवश्यक माहितीचे तातडीने अद्ययावतीकरण करावे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वत:च्या कुटुंबापासून सुरवात करून मोहिमेची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांचे नियोजन करावे. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांची पथके तयार करून गृहभेटींद्वारे नोंदणी करावी. मुदतबाह्य झालेल्या शिधापत्रिका नुतनीकरण करण्यासाठी
शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. या मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रचार व प्रसिद्धी करावी. आगामी गणेशोत्सवातही अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन करून नागरिकांना आयुष्यमान कार्ड नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत दिल्या.
(कल्पेश लचके)






















