बाहेर वावरताना तुम्ही कसं बोलावं, कसा व्यवहार करावा हे इतरत्र जगात तुम्हाला कोणीही शिकवेल. मात्र तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा हवा हे गुरुच उलगडून दाखवेल. जसा तुमचा दृष्टिकोन असतो तशी भाषा आणि तसं तुमचं व्यावहारिक जीवन घडत असते. म्हणूनच जीवन बदलायचं असेल तर तुमचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. यासाठी दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. यांनी केले.
परिवर्तन २०२५ चातुर्मास महोत्सवामध्ये आचार्य आनंदऋषीजी यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने आनंदगाथा या सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. या वेळी प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले, गुरु एक धगधगती ज्वाला, एक आग आहे. आगीचे देखील दोन प्रकार आहेत. एक आग स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवण्यासाठी वापरली जाते, तर दुसरी आग यज्ञ, होम हवन ज्यावर मंत्र, तंत्र, यंत्र यांच्या उच्चारणाने आयुष्य घडत असतं. त्यामुळे गुरु ही जणू यज्ञातील आग आहे. त्यामुळे आपली दृष्टी नुसतं चुलीमध्ये इंधन घालणारी हवी की यज्ञातील आगीत आहुती देणारी हवी. हे आपण जाणून घेणे गरजेचे आहे. जेव्हा आपण एखादा प्रवचन ऐकतो त्यावेळी स्वतःला एक प्रश्न विचारून पहा. मी जे काही ऐकलं ते ऐकून माझं ज्ञान वाढलं की माझी दृष्टी किंवा माझा दृष्टिकोन बदलला? कारण दृष्टीने जीवन घडत असते. दृष्टीतूनच सृष्टीचा जन्म होत असतो. अशी थोडीशी भावना जरी आपल्या मनात उफाळून आली आणि आपल्यात सकारात्मक दृष्टिकोन जर जन्मास आला, तर आपलं जीवन हे नक्कीच आनंदाने भरलेले असेल. ज्या दिवशी दृष्टिकोन बदलेल तेव्हाच खर्या अर्थाने जीवन प्रवास सुरू झालेला असेल.
प. पु. प्रवीणऋषीजी म. सा.म्हणाले, जो गुरु आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असतो. ज्याची आपण भक्ती, पूजा करत असतो, तो गुरु इतका वंदनीय, पूजनीय कसा काय? असं काय असतं त्यांच्याजवळ, हा प्रश्न आपल्याला पडतो का? त्याचं उत्तर आहे ‘दृष्टिकोन’. त्यामुळे पूज्य होण्यासाठी ‘पूज्य दृष्टीची’ गरज असते. पूज्य म्हणजे काय तर पदवी, दर्जा, गुणवत्ता होय.
पूज्य किंवा पूजनीय कोण असतं तर त्याचे उत्तर देताना प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. म्हणाले, जे शब्दजीवी असतात ते फक्त शब्दांचेच गुलाम असतात. पण ज्याला गुरूच्या आतील स्पंदनांची, कंपनांची जाणीव होते आणि त्याला शब्दाची गरज भासत नाही ते पूज्य असतात. गुरुच्या इच्छेची केवळ पूर्ती न करता त्याची आराधना करतो तो पूज्य असतो. गुरुची इच्छापूर्ती आणि आवश्यकतापूर्ती हे पूज्य नाही. म्हणूनच गुरुची सेवा करताना, सानिध्यात राहताना जागृत राहणं फार महत्त्वाचे आहे. यातूनच आपल्याला दृष्टी प्राप्त होत असते.
जीवन सुधारण्या करिता गुरूंचे महत्व प. पु. प्रवीणऋषीजी म. सा.






















