उमरगा :
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी विभागाचा कॅडेट शुभम राठोड याची भारतीय सैन्यदलात ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी शुभमचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शुभम हा कदेर तांडा येथील रहिवासी असून त्याचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शुभमला कोणत्याही खाजगी अकॅडमीत जाणे शक्य नव्हते. मात्र, वडिलांनी त्याला खचून न देता स्वतः सराव करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि महाविद्यालयातील एनसीसी विभागात प्रवेश घेण्यास सांगितले. त्यांचा मोठा मुलगा हवलदार पदावर कार्यरत आहे, परंतु शुभमनेही भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करावी ही वडिलांची इच्छा शुभमने आपल्या कष्टाच्या जोरावर सार्थ ठरवून दाखवली.
या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी सांगितले की, इतर कॅडेट्सनी देखील शुभमचा आदर्श समोर ठेवावा. विद्यार्थ्यांनी सैन्यदल, पोलीस, बीएसएफ, सीआरपीएफ, आसाम रायफल्स आणि आयटीबीपी यांसारख्या विविध विभागातील भरतीची तयारी करावी. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस व सैन्यदल पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि करिअर कट्टा यांसारख्या सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्याला डॉ. पद्माकर पिटले, डॉ. अशोक पदमपल्ले, डॉ. विनोद देवरकर, कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, डॉ. व्यंकट सूर्यवंशी, डॉ. सूर्यकांत रेवते, डॉ. धनराज इटले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिद्द आणि चिकाटी: मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा झाला ‘अग्निवीर’


























