माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून पोलीस अधीक्षकांना पत्र
नाशिक,(आसिफ पठाण):- नायलॉन मांजामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना गंभीर अशी दुखापत होत आहे. त्याचबरोबर पक्षी व प्राणी देखील गंभीर जखमी होत असून काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात येवला, सिन्नर, लासलगाव, बागलाण मध्ये देखील नुकत्याच गंभीर स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहे. आशा प्रकारच्या घटनांना तात्काळ आळा घालण्यासाठी नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली आहे.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी नायलॉन मांजाबाबत नाशिकचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना याबाबत पत्र दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजा (चायनीज/सिंथेटिक मांजा) यांच्या बेकायदेशीर विक्री व वापरामुळे गंभीर व अत्यंत दुर्दैवी घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. या नायलॉन मांजामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले, महिला तसेच पक्षी व प्राणी यांना गंभीर दुखापती होत असून, काही ठिकाणी निष्पाप नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात नुकतेच येवला,लासलगाव, बागलाण आणि सिन्नर आदी ठिकाणी नायलॉन मांजामुळे गंभीरपणे दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहे. या घटना अत्यंत चिंताजनक असून समाजमन हेलावून टाकणाऱ्या आहेत.
नायलॉन मांजा हा अत्यंत धारदार, न तुटणारा व मानवी जीवनासाठी प्राणघातक ठरणारा असल्याने त्याच्या वापरावर व विक्रीवर शासनाने यापूर्वीच बंदी घातलेली आहे. मात्र, प्रत्यक्षात काही बेजबाबदार व लोभी विक्रेते तसेच साठेबाज हे शासनाच्या आदेशांना धाब्यावर बसवून गुपचूपपणे नायलॉन मांजाची विक्री करीत आहेत. परिणामी,कायद्याची भीती न बाळगता हा जीवघेणा प्रकार सुरूच असून, नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्यात घडलेल्या विविध अपघातांच्या घटनांचा अभ्यास करता, ही केवळ निष्काळजीपणाची बाब नसून संगनमताने चालविलेला बेकायदेशीर व्यवसाय असल्याचे स्पष्ट होते. अशा विक्रेत्यांमुळे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, तर थेट मानवी जीविताला धोका पोहोचत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर केवळ सामान्य स्वरूपाची कारवाई अपुरी ठरणार असून, कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) हा कायदा समाजासाठी गंभीर धोका निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारीविरोधात लागू करण्यात आला आहे. नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री, साठवणूक व वितरण हे संघटित स्वरूपात चालत असल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर, पुरवठादारांवर व त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच, नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून नायलॉन मांजाची विक्री करणारी सर्व दुकाने, गोदामे व साठवणूक केंद्रांवर छापे टाकण्यात यावेत. जप्त केलेला नायलॉन मांजा तात्काळ नष्ट करण्यात यावा.भविष्यात अशा प्रकारची विक्री पुन्हा होऊ नये, यासाठी सतत गस्त,गुप्त माहितीच्या आधारे कारवाई व नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. तसेच निष्पाप नागरिकांचे प्राण वाचविणे ही प्रशासनाची व पोलिसांची सर्वोच्च जबाबदारी आहे. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि दोषींना कायमचा धडा शिकविण्यासाठी कठोरात कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे. याबाबत आपण वैयक्तिक लक्ष घालून तातडीने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली आहे.


























