लासलगाव (आसिफ पठाण)
उमरगा: येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील विद्यार्थ्यांनी धाराशिव येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचे प्रतिष्ठेचे ‘जनरल चॅम्पियनशिप’ पदक पटकावले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत एकूण १८ पदके जिंकून घवघवीत यश संपादन केले.
या यशानंतर गुरुवार, दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी महाविद्यालयात विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र आणि पदके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. अस्वले यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरापुरते मर्यादित न राहता, मेहनत, कष्ट व जिद्दीच्या बळावर राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करावे, असे आवाहन केले. तसेच, खेळाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने आयोजित केलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांनी भाग घेऊन खेळामध्ये नावलौकिक कमवावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या सत्कार समारंभासाठी महाविद्यालयातील डॉ. विलास इंगळे, खेळ विषयाचे विभाग प्रमुख प्रा. विजय पवार, डॉ. राजू सूर्यवंशी, प्रा. गोविंद गायकवाड, कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, प्रा. शैलेश महामुनी, राजकुमार सोनवणे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
विजेत्या खेळाडूंचा तपशील:
स्पर्धेत भोसले नामदेव याने ५ किमी धावण्यात प्रथम स्थान मिळवले. पुजारी प्रथमेश याने ८०० मीटर धावण्यात प्रथम आणि १० किमी धावण्यात द्वितीय स्थान प्राप्त केले. रिले मुले (४x४०० मीटर) संघात झंपले सिद्धु, सास्तुरे किरण, बनसोडे आकाश आणि हाके प्रशांत यांनी प्रथम स्थान पटकावले. जमादार कृष्णा याने लांब उडीत प्रथम, तर प्रेमनाथ जमादार याने भाला फेकमध्ये द्वितीय स्थान मिळवले. होगाडे चंदाप्पा ५ किमी धावण्यात द्वितीय, हाके प्रशांत १०० मी आणि २०० मी धावण्यात द्वितीय, आणि झंपले सिद्धू १५०० मीटर धावण्यात तृतीय स्थानी राहिला.
मुलींमध्ये शेख सानिया हिने १०० मीटर धावणे आणि लांब उडीत प्रथम स्थान मिळवले. जमादार राधा गोळा फेकमध्ये द्वितीय, मम्माळे राधिका २०० मी आणि ४०० मी धावण्यात द्वितीय स्थानी राहिली. रिले मुली (४x४०० मीटर) संघात जमादार राधा, मम्माळे राधिका, शेख सानिया आणि सुर्यवंशी राजनंदिनी यांनी प्रथम स्थान मिळवले. सुर्यवंशी राजनंदिनी हिने ५ किमी आणि १० किमी धावण्यात द्वितीय स्थान मिळवून महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
या घवघवीत यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे आणि सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.


























