चांदवड (कीर्ती गुजराथी) –
चांदवड नगरपरिषदेच्या प्रभाग ३अ जागेसाठी उद्या (दि. २०) मतदान होणार आहे. या प्रभागात एकूण २०६० मतदार असून त्यात १०३३ पुरुष व १०२७ महिला मतदारांचा समावेश आहे. हे मतदार पुन्हा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरातील दोन मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या प्रभाग ३अ जागेची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये स्थगीत करण्यात आली होती. या जागेसाठी सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार या जागेसाठी शनिवारी (दि. २०) सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत शहरातील गुंजाळ विद्यालयातील आदर्श शिशुविहार व अभिनव बालविकास मंदिर येथील इमारतीतील खोली क्र. २ व ४ या दोन मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी व १ कर्मचारी अशा एकूण ५ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी २ ईव्हीएम यंत्र व २ राखीव अशा एकूण ४ ईव्हीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांच्या तर्जनीवर जुनी शाई असल्यास डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मतपत्रिका सफेद रंगाची राहणार असून या जागेसाठी ५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मतदान अधिकारी, कर्मचार्यांना निवडणूक साहित्य वाटप करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद कुलकर्णी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली.
———
फोटो- चांदवड येथे मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना झालेले मतदान अधिकारी व कर्मचारी.





























