लासलगाव (आसिफ पठाण) : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मक्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजार समिती गजबजली असून अवघ्या दोन दिवसांत कंटेनरच्या माध्यमातून मका थेट व्हिएतनामकडे रवाना करण्यात आला आहे. निर्यातीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हंगामात सलग पाच ते सहा महिने समाधानकारक पावसामुळे मक्याचे उत्पादन भरघोस झाले. तुलनेने कमी उत्पादन खर्च आणि चांगले उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात मक्याकडे वळल्याचे चित्र आहे. परिणामी लासलगाव बाजार समितीत मक्याची विक्रमी आवक नोंदविण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मते, मक्याच्या पिकावर रोगराईचे प्रमाण कमी असून उत्पादन खर्चही कमी आहे. कोंबडी व जनावरांचे खाद्य, पॉपकॉर्न, स्टार्च तसेच इथेनॉल निर्मितीसाठी मक्याला वर्षभर मागणी असल्याने दरात फारशी चढउतार होत नाही. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि परवडणारे ठरत आहे. यंदाच्या हंगामात लासलगाव बाजार समितीत मक्याला किमान १,७०० ते कमाल १,९५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. विशेष म्हणजे भारतासह बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ आणि व्हिएतनाम या देशांकडून मक्याला मोठी मागणी आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या हंगामात केवळ व्हिएतनामसाठी सुमारे १५ हजार टन मका जहाजाद्वारे निर्यात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सोयाबीनच्या तुलनेत मक्याच्या लागवडीचा खर्च सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी कमी येतो. तसेच मक्याची काढणी झाल्यानंतर त्याच शेतात रब्बी हंगामात कांद्याची लागवड करता येत असल्याने दुहेरी लाभ मिळतो. त्यामुळे आगामी काळात मक्याखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या लासलगाव बाजार समितीच्या आवारातून कंटेनरद्वारे मका मुंबईला पाठवण्यात येत असून तेथून जहाजाने व्हिएतनामकडे निर्यात केली जात आहे. देशांतर्गत मक्याचा दर्जा उत्तम असल्याने परदेशी बाजारात भारतीय मक्याला विशेष मागणी वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच कमी उत्पादन खर्च, स्थिर बाजारभाव आणि निर्यातीच्या संधी यामुळे यंदा मका हे पीक शेतकऱ्यांसाठी नफा देणारे पीक ठरत असल्याचे चित्र लासलगाव बाजार समितीत स्पष्टपणे दिसून येत आहे. *कोट*…. या हंगामात दर्जेदार उत्पादन व स्थिर दरामुळे भारतीय मक्याला परदेशी बाजारात चांगली मागणी निर्माण झाली आहे. लासलगाव बाजार समितीतून व्हिएतनामसह इतर देशांसाठी होत असलेली मका निर्यात ही शेतकरी व व्यापारी दोघांसाठीही दिलासादायक बाब आहे. उत्पादन खर्च कमी, दर्जा उत्तम आणि वेळेवर बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत आहे. भविष्यात शासनाने निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ करून वाहतूक, साठवणूक व लॉजिस्टिक सुविधा मजबूत केल्यास मका निर्यातीत आणखी वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य येईल. प्रतिक्रिया -सागर थोरात, मका निर्यातदार, लासलगाव बाजार समिती


























