निफाड ( वार्ताहर )
* निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील श्री दत्त देवस्थान हे अतिशय महत्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या भाविकांना चांगल्या दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी अधिक विकासकामे करण्यास प्राधान्य देण्यात येतील असे प्रतिपादन आ. पंकज भुजबळ यांनी केले.
धारणगांव खडक येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत श्री दत्त देवस्थान मंदिराजवळ २० लाख रुपये निधीतून सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मठाधिपती महेशगिरी महाराज, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, डॉ.श्रीकांत आवारे, पांडुरंग राऊत, विनोद जोशी, अशोक नागरे, शिवाजी सुपनर, अनिल सोनवणे, बालेश जाधव, विलास गोरे, विष्णू पुंड, ओम राऊत, अनिल विंचूरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री म्हणून काम करत असताना नाशिकसह राज्यातील धार्मिक स्थळांचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी लोकसभा क्षेत्रातील महत्वाच्या देवस्थानाचा विकास केला आहे. सप्तशृंगी गडावर फर्निक्युलर ट्रॉली विकसित केली. त्याचबरोबर नस्तनपूर, कोटमगाव जगदंबा देवी, चांदवड येथील रेणुका माता यासह विविध धार्मिक स्थळांचा विकास केला असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या देवस्थानाच्या परिसरात अधिक विकास करण्याच्या दृष्टीने कामे करण्यात येतील. तसेच येथील रस्ते व परिसरातील सुशोभिकरणाची कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.


























